ऊस लागवड पिकात – खतांचे महत्व – भाग -7- Sugarcane cultivation importance of fertilizer

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

ऊस लागवड पिकात – खतांचे महत्व -Sugarcane cultivation importance of fertilizer

उसाच्या उत्पादनवाढीसाठी सेंद्रिय तसेच रासायनिक खतांचा माती परीक्षणानुसार वापर करणे आवश्‍यक आहे. ऊस उत्पादकता वाढविण्याबरोबर उसाच्या रसाची प्रत सुधारणे महत्त्वाचे आहे. पिकाच्या योग्य वाढीसाठी जमिनीची सुपीकता आणि खत व्यवस्थापनाकडे लक्ष दिल्यास अपेक्षित उत्पादन घेता येईल.

ऊस पीक परिस्थिती लक्षात घेता पीक फेरपालटीचा अभाव, सेंद्रिय खतांची कमतरता, रासायनिक खतांचा असंतुलित वापर, अवर्षण परिस्थिती किंवा पाण्याचा जास्त वापर आणि निचऱ्याच्या अभावामुळे क्षारयुक्त, चोपण जमिनीच्या वाढत्या समस्या इत्यादी बाबींमुळे ऊस उत्पादकता घटलेली दिसून येते. अशा परिस्थितीत जमिनींचा अभ्यास करून माती परीक्षणाच्या आधारे मृदा सुपीकतेची पातळी टिकविणे आणि क्षारयुक्त, क्षारयुक्त चोपण जमिनीची सुधारणा करणे आवश्‍यक आहे. जमिनीची मशागत चांगली होण्यासाठी उभी-आडवी नांगरट वाफसा असताना करावी, म्हणजे ढेकळे निघणार नाहीत. कुळवणीनंतर जमीन भुसभुशीत होईल. पूर्व मशागत खोल आणि चांगली झाल्यास मुळांची वाढ चांगली होऊन जमिनीत उपलब्ध असलेले व खतांच्या माध्यमातून दिलेले अन्नद्रव्ये शोषली जातात.

सेंद्रिय खतांचा वापर

ऊस पिकासाठी साधारणतः हेक्‍टरी 20 टन शेणखत आणि कंपोस्ट खताचा वापर करावा. पूर्वमशागतीच्या वेळी हेक्‍टरी दहा टन शेणखत आणि रासायनिक खतांचा पहिला हप्ता सरीमध्ये मातीत मिसळावा. सेंद्रिय खतांमुळे जमिनीत हवा व पाणी यांचे संतुलन राखले जाते, जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, निचरा सुधारतो, जिवाणूंची वाढ होते, रासायनिक खतांचा कार्यक्षमतेने वापर होतो. अलीकडे बरेच शेतकरी सेंद्रिय खतांच्या कमतरतेमुळे रासायनिक खतांचा वापर जास्त करतात; परंतु शाश्‍वत ऊस उत्पादकतेसाठी हा पर्याय नाही. शेणखत किंवा कंपोस्ट खत पुरेसे नसल्यास हिरवळीची खते, साखर कारखान्याची प्रेसमड ( भुसुरक्षा ), कोंबडी खत, बायोकंपोस्ट उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या पेंडी, पाचटाचे आच्छादन अशा अनेक पर्यायांनी जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ मिसळता येतात. जमिनीमध्ये साधारणपणे 0.75 ते 1.00 टक्का इतका सेंद्रिय कार्बन असणे आवश्‍यक आहे.

See also  मेनोपाॅज म्हणजे काय?menopause meaning in marathi

रासायनिक खतांचा वापर

ऊस शेतीसाठी एकूण जो खर्च येतो, त्यापैकी 30 ते 35 टक्के खर्च रासायनिक खतांसाठी होतो. म्हणून रासायनिक खते वापरण्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कित्येक वेळा शास्त्रीय दृष्टिकोनातून रासायनिक खतांचा वापर केला जात नाही. खतांचा वापर किफायतशीर होण्यासाठी खताचे योग्य प्रकारे नियोजन व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे महत्त्वाचे आहे. त्यामध्ये खताची योग्य निवड, योग्य मात्रा, योग्य वेळ, योग्य पद्धत इत्यादी गोष्टींचा समावेश होतो.

खतांची निवड

सध्या बाजारात बऱ्याच प्रकारची खते उपलब्ध आहेत. त्यापैकी त्यात असणारे अन्नघटक व त्यांचे प्रमाण याचा विचार करून योग्य ती खते निवडावीत. ऊस पिकास दुसऱ्या व तिसऱ्या खताच्या हप्त्याच्या वेळी फक्त नत्रयुक्त खते द्यावी लागतात. अशा वेळी मिश्र खते वापरण्याची गरज नाही. मिश्र खते ऊस लागवडीच्या वेळी आणि मोठ्या बांधणीच्या वेळी देणे योग्य आहे. दोन्हीही वेळेस मिश्र खतात अन्नद्रव्याचे प्रमाण योग्य नसल्यास युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट व म्युरेट ऑफ पोटॅश यांसारखी सरळ खते योग्य प्रमाणात मिसळून द्यावीत. जमीन खारवट चोपण असल्यास शक्‍यतो सरळ खतांची निवड करावी. याशिवाय माती परीक्षण अहवालानुसार ज्या आवश्‍यक अन्नघटकांची कमतरता असेल, अशा अन्नघटकांचा विचार करून खते निवडावीत.

खतांची मात्रा

शास्त्रीयदृष्ट्या मातीचे परीक्षण करून त्याप्रमाणे खतांच्या मात्रा ठरविणे फायद्याचे ठरते. त्यासाठी प्रातिनिधिक मातीचा नमुना घेऊन तज्ज्ञांकडून तपासून घ्यावा व माती परीक्षण  अहवालानुसार तज्ज्ञांच्या सल्ल्याने खतांच्या मात्रा द्याव्यात. शिफारशित असलेल्या खतांच्या मात्रा या मध्यम ते भारी मगदुराच्या जमिनीसाठी केलेल्या आहेत  परंतु हलक्‍या प्रकारच्या जमिनीसाठी रासायनिक खते सेंद्रिय खतांमध्ये मिसळून द्यावी. ज्या ठिकाणी पिकांस पाण्याचा ताण पडतो, अशा जमिनीत पालाश खतांची मात्रा हेक्‍टरी 50 किलोने वाढवून द्यावी.

को 86032 या मध्यम-उशिरा पक्व होणाऱ्या ऊस जातीस अन्नद्रव्यांची गरज जास्त असल्याने या जातीस नत्र, स्फुरद व पालाशयुक्त खतांची मात्रा 25 टक्के वाढवून द्यावी. आपल्या भागातील जमिनीमध्ये पूर्व आणि सुरू हंगाम  उसाच्या अधिक उत्पादनासाठी व आर्थिक फायद्यासाठी ऊस पिकास पूर्व हंगाम करिता एकरी 160 किलो नत्र व 70 किलो स्फुरद या मात्रेबरोबर 70 किलो पोटॅश तसेच सुरू हंगाम ऊस पिकास एकरी 120 किलो नत्र व 60 किलो स्फुरद व 60 किलो  पोटॅश देण्याची शिफारस करण्यात आली आहे.

See also  मुंबईत नवीन ॲपल स्टोअर ची १० वैशिष्ट्ये - Apple BKC first store in India.

खते देण्याच्या पद्धती व काळजी -Sugarcane cultivation importance of fertilizer

  1. रासायनिक खतांची उपयुक्तता वाढविण्यासाठी खतांचा योग्य पद्धतीने वापर करणे आवश्‍यक आहे. मुख्यत्वे खते जमिनीवर पसरून देणे, जमिनीतून देणे व फवारा या तीन पद्धतीने दिली जातात.
  2. खते जमिनीत पेरून अथवा ठिबक सिंचनाने देणे फारच फायदेशीर ठरते. तुषार सिंचन पद्धतीनेही पाण्याबरोबर खते देता येतात.
  3. रासायनिक खते कुदळीने चळी घेऊन किंवा खत देण्याच्या अवजारांच्या साह्याने द्यावीत.
  4. खत दिल्यानंतर चळी मातीने बुजवून घ्याव्यात, म्हणजे युरियासारखी खते मातीच्या ओल्या भागाबरोबर मिसळतील. युरियाचे विघटन होऊन अमोनिअम नत्रामध्ये रूपांतर होते व अमोनिअम नत्र मातीच्या कणाशी घट्ट धरला जातो व हवेद्वारे नुकसान होण्याचा धोका कमी होतो.
  5. उभ्या पिकात खते देताना जमिनीत थोडासा ओलावा असावा. रासायनिक खते दिल्यानंतर लगेच पाणी देऊ नये. शक्‍यतो दुसऱ्या दिवशी हलके पाणी द्यावे. कारण युरियासारखी खते पाण्यात विरघळून निचऱ्यावाटे वाहून जातात किंवा सरीच्या एका कडेला जमा होतात.
  6. युरियातील नत्राची पिकास उपयुक्तता वाढविण्यासाठी निचऱ्यावाटे किंवा हवेद्वारे होणारे नत्राचे नुकसान कमी करण्यासाठी युरिया व निंबोळी पेंडीची भुकटी 6ः1 प्रमाणात मिसळावी. त्यावर थोडे पाणी शिंपडावे व मिश्रण चांगले घुसळून घ्यावे.
  7. युरियाच्या कणांवर निंबोळी पेंडीचे आवरण तयार होते व त्यामध्ये असलेल्या निमीन, निंबीबीन व निबीनीन या घटकद्रव्यांमुळे नत्रीकरण मंद गतीने होते व त्यातील नत्र पिकास योग्य प्रमाणात हळूहळू उपलब्ध होते. या पद्धतीने युरिया (नत्र) दिल्यास युरियाच्या वापरात 25 टक्के बचत करता येते. (सध्या बाजारात या पद्धतीने तयार केलेला युरिया उपलब्ध आहे)
  8. स्फुरद युक्त खतातील स्फुरद, नत्रासारखे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हालचाल करत नाहीत कारण जमिनीत दिल्यानंतर स्फुरद लगेच मातीच्या कणांशी घट्ट चिकटून बसतो व जमिनीतील चुना, लोह याबरोबर रासायनिक अभिक्रिया होऊन स्फुरदाची काही अविद्राव्य संयुगे तयार होतात आणि स्फुरद पिकास उपलब्ध होत नाही.
  9. स्फुरदयुक्त खते मुळाच्या सान्निध्यात किंवा कंपोस्ट खतात मिसळून द्यावीत. (स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू खताचा वापर केल्यास स्फुरदाची उपलब्धता वाढते.)
  10. हिरवळीचे पीक घेऊन ऊस लागवड करावयाची असल्यास उसास देण्यात येणारा स्फुरद खताचा पहिला हप्ता हिरवळीच्या पिकास द्यावा. त्या वेळी उसाची लागवड करताना स्फुरद खत देण्याची गरज नाही.
  11. स्फुरदयुक्त खतांप्रमाणे पालाशयुक्त खते पाण्याच्या निचऱ्यावाटे वाहून जाण्याचा धोका कमी असतो. ही खतेदेखील सरीमध्ये  द्यावीत. शक्‍यतो ही खते नत्रयुक्त खताबरोबर दिल्यास चांगला परिणाम होतो.
See also  शेवगा लागवड - Moringa Cultivation Maharashtra

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा